उद्योग

उद्योग म्हणजे काय ? WHAT IS INDUSTRY ?

उद्योग म्हणजे काय ?

उद्योग म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, उद्योग म्हणजे आपण स्वतः एखादे नवीन प्रॉडक्ट किंवा वस्तू तयार करणे.

आत्ता आपण थोडा विस्तार मद्ये “उद्योग” ची व्याख्या जाणून घेऊया.

उद्योग ह्या संज्ञेत प्रचलित अर्थाने अनेक आर्थिक व्यवहारांचा समावेश होतो. परंतु औद्योगिक अर्थशास्त्रात उद्योग ह्या शब्दाला मर्यादित अर्थ आहे. ह्या संदर्भात उद्योग म्हणजे ज्या उत्पादनसंस्थांत नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा पुढील उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त, असा एकच प्रकारचा माल निर्माण केला जातो, अशा उत्पादनसंस्थांचा समूह. या अर्थाने उद्योग ह्या संज्ञेत उपभोग्य व उत्पादक वस्तूंचे उद्योग, कुटिरोद्योग, लघुउद्योग व हस्तव्यवसाय ह्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर ह्या व्यापक वर्गीकरणातील प्रत्येक प्रकारच्या उद्योगातसुद्धा अनेक उद्योग आहेत. उत्पादनसंस्था व उद्योग ह्यांतील फरक स्पष्ट करणे जरूर आहे; उद्योग म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तू निर्माण करणाऱ्या अनेक उत्पादनसंस्थांचा समूह. उदा., कापड उद्योग आणि या संदर्भात उत्पादनसंस्था म्हणजे कापड कारखाना.

उद्योगांचे वर्गीकरण: ( Classification of industries )

उद्योगांचे वर्गीकरण खालील प्रमाणे केले जाते ते जाणून घेऊया.

उद्योग ह्या संज्ञेची राष्ट्रातील आर्थिक व्यवहारांच्या वर्गीकरणावरूनसुद्धा व्याख्या करता येईल. राष्ट्रातील आर्थिक व्यवहारांचे वर्गीकरण तीन विभागांत करतात, ते असे : प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक विभाग. हे वर्गीकरण प्रामुख्याने या तीन विभांगातील उत्पादनाचे स्वरूप व त्यातील मानवी श्रमाचा भाग, ह्या दोन गोष्टी पुढे ठेवून केले आहे. प्राथमिक विभागातील कृषि-उद्योग, खनिकर्म, जंगल उद्योग, मच्छीमारी ह्यांचा जो तयार माल उपलब्ध होतो, त्यात निसर्गदत्त देणगीचा वाटा मोठा असून मालावरील प्रक्रियेत मानवी श्रमाचा भाग मर्यादित असतो. द्वितीयक विभागात नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून तिचे उपभोग्य वा पुढील टप्प्यांच्या वस्तूंच्या उत्पादनास योग्य, असे रूपांतर केले जाते. ह्या विभागात इतर आर्थिक व्यवहारांबरोबर अवजड उद्योगधंदे, भांडवली उद्योगधंदे, उपभोग्य वस्तूंचे उद्योगधंदे, कुटिरोद्योग, हस्तव्यवसाय, लघुउद्योग ह्यांचाही समावेश होतो. ह्या विभागातील मालाच्या उत्पादनात मानवी प्रयत्नाचा वाटा मोठा असतो. तृतीयक विभाग म्हणजे सेवा विभाग व वाहतूक, दळणवळण इत्यादी. ह्यात डॉक्टर, वकिलापासून घरगड्यापर्यंतच्या विविध तऱ्हांच्या व्यवसायांचा समावेश होतो. ह्या विभागाचे वैशिष्ट्य असे की, ह्यात दृश्य वस्तूंचे उत्पादन होत नाही.

 • गुंतविलेल्या भांडवलाच्या प्रमाणावरून उद्योगांचे भांडवलप्रधान व श्रमप्रधान असे वर्गीकरण करतात. भांडवलप्रधान उद्योगांमध्ये, उत्पादन क्रियेत यंत्रसामग्रीचा प्रकर्षाने उपयोग केला जातो व मानवी श्रमाचा भाग दुय्यम असतो. साहजिकच अशा उद्योगांत रोजगारीची उपलब्धता कमी प्रमाणात असते. याउलट श्रमप्रधान उद्योगांत उत्पादनक्रियेत यंत्रावजारांचा उपयोग मर्यादित असून मानवी श्रमांचा भाग प्रमुख असतो. त्यामुळे अशा उद्योगांत रोजगारीला जास्त वाव असतो.उद्योगांत निर्माण होणाऱ्या मालाच्या आकारावरून व वजनावरून अवजड व उपभोग्य वस्तु-उद्योग असे वर्गीकरण करतात. अवजड उद्योगांत निर्माण होणारा माल आकाराने मोठा व वजनाने जड असून प्रायः असे उद्योग पुढील उत्पादनास उपयोगी पडणारा यंत्रावजारांसारखा माल निर्माण करतात. उपभोग्य वस्तु-उद्योगांत प्रायः उपभोग्य मालच निर्माण केला जातो.
 • उद्योगांचे मोसमी उद्योग व बारमाही उद्योग, असेही एक वर्गीकरण केले जाते. मोसमी उद्योगांत साखर कारखाने वगैरेंचा अंतर्भाव होतो. अशा कारखान्यांत वर्षातून काही काळच उत्पादन चालू असते, ह्याचे कारण ह्या उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा किंवा ह्या उद्योगाच्या मालाची मागणी विशिष्ट ऋतूंपुरतीच मर्यादित असते. परंतु बारमाही उद्योगांत वर्षभर उत्पादन चालू असते.शेतीशी संबद्ध उद्योग व इतर उद्योग, असेही उद्योगांचे विभाग करतात. शेतीशी संबद्ध उद्योगांत शेतीतील मालावर प्रक्रिया करण्याचे काम प्रधान असते. तांदूळ कांडण्याच्या व तेलाच्या गिरण्या, गूळ तयार करणे वगैरे उद्योग ह्या वर्गात मोडतात.प्रमुख उद्योग व साहाय्यक उद्योग ह्या वर्गीकरणाप्रमाणे ज्या उद्योगांत तयार माल निर्माण होतो, ते प्रमुख होत व ज्या उद्योगांत, प्रमुख उद्योगांत निर्माण होणाऱ्या मालाच्या उत्पादनाकरिता लागणारा एखादा भाग निर्माण केला जातो, त्यांना साहाय्यक उद्योग असे अभिधान आहे.
 • सरकारी क्षेत्रातील उद्योग, खाजगी क्षेत्रातील उद्योग व संयुक्त उद्योग (म्हणजे ज्या उद्योगांत सरकारी व खाजगीही भांडवल असते, असे उद्योग), असेही उद्योगांचे वर्गीकरण करतात. सरकारी क्षेत्रात उद्योग असण्याची कारणे अनेक आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले उद्योग सर्वसाधारणपणे सरकारी क्षेत्रातच असतात. त्याच बरोबर जे उद्योग आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे आहेत, परंतु ज्यांत नफ्याच्या अनिश्चिततेमुळे खाजगी भांडवल प्रवेश करण्यास धजत नाही किंवा ज्यांतील गुंतविलेले खाजगी भांडवल गरजेच्या मानाने अपुरे असते, असेही उद्योग सरकारी क्षेत्रातच सुरू केले जातात. त्याचप्रमाणे अत्यावश्यक वस्तूंचे उद्योगही सरकार सुरू करते. काही वेळा खाजगी क्षेत्रातील भांडवल आकृष्ट करण्याकरिताही शासन काही उद्योगांत प्रथम भांडवल गुंतविते व अशा तऱ्हेने अशा उद्योगांच्या विकासाला पोषक वातावरण निर्माण करते. औद्योगिक क्षेत्रात सरकारी वाटा वाढण्याच्या प्रचलित प्रवृत्तीला अर्थात अनेक कारणे आहेत. काही देशांत राजकीय विचारप्रणालीच्या दबावामुळे राष्ट्रीयीकरणाला चालना मिळाली आहे, तर काही ठिकाणी आर्थिक विकासाला वेग व गती देण्याकरिता सरकारने औद्योगिक क्षेत्रात भरीव भाग घेतला आहे.
 • उद्योगांच्या मालकीवरून परदेशी व स्वदेशी अशी उद्योगांची विभागणी करता येईल. देशात नोंद झालेले व देशी भांडवल असलेले उद्योग स्वदेशी उद्योग म्हणून ओळखले जातात. ज्या उद्योगांचे उत्पादन घटक व उत्पादन आपल्या देशात आहे, परंतु जे उद्योग आपल्या देशाबाहेर नोंद झाले आहेत व ज्यांत प्रायः परदेशी भांडवल गुंतवणूक आहे, अशा उद्योगांना परदेशी उद्योग असे नाव दिले जाते. काही वेळा परदेशी उद्योग-संयोजक, स्थानिक उद्योग-संयोजकाशी तांत्रिक वा भांडवलविषयक सहकार्याचा करार करून उत्पादन कार्यात सहभागी होतात. अशा उद्योगांत व्यवस्थापन व मालकी प्रायः स्थानिकच असते. अर्थात परदेशी उद्योग असोत वा तांत्रिक वा भांडवली सहकार्याचा करार असो, असे उद्योग सुरू करण्याकरिता वा करार करण्याकरिता स्थानिक सरकारच्या अनुमतीची जरूरी असते.

उद्योगांचे वरील वर्गीकरण जरी अनेक दृष्टींनी उपयुक्त असले, तरी राष्ट्राराष्ट्रांतील औद्योगिक विकासाची तुलना करता यावी, म्हणून सर्व राष्ट्रांना मान्य अशा प्रमाणित वर्गीकरणाची जरूरी आहे. ह्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आंतरराष्ट्रीय प्रमाणित औद्योगिक वर्गीकरणाचा एक मसुदा तयार केला असून, त्यात उत्पादनाकरिता लागणारा कच्चा माल प्रमाणित धरून, पंचवीस प्रमुख शीर्षकांखाली उद्योगांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे. ही पंचवीस प्रमुख शीर्षके अशी आहेत :

 1. कोळसा खाणकाम
 2. धातू खाणकाम
 3. अशुद्ध खनिज तेल व नैसर्गिक वायू
 4. दगड, माती व वाळू यांचे खाणकाम
 5. इतर बिगरधातूंचे खाणकाम
 6. खाद्य पदार्थ निर्मितीउद्योग
 7. पेयनिर्मिति उद्योग
 8. तंबाखूचे पदार्थ (सिगारेट, चिरूट इ)
 9. कापड उद्योग
 10. पादत्राणे व तयार कपडे
 11. फर्निचर खेरीज इतर लाकडी व बुचाच्या वस्तू
 12. कागद व कागदी वस्तू
 13. छपाई, प्रकाशन व संबंधित उद्योग
 14. पादत्राणांखेरीज इतर चर्मवस्तू व चामडी
 15. रबरी वस्तू
 16. रसायने व रासायनिक पदार्थ निर्मितीउद्योग
 17. पेट्रोल व कोळसा पदार्थ उद्योग
 18. बिगर धातु-खनिज वस्तुपदार्थ उद्योग
 19. मूलभूत धातुउद्योग
 20. धातु-पदार्थ निर्मितिउद्योग
 21. बिगरविद्युत्‌यंत्र निर्मितिउद्योग
 22. विद्युतयंत्रे व उपकरणे निर्मितिउद्योग
 23. वाहतूक सामग्रीची निर्मिती
 24. अन्य वस्तु-निर्मितीउद्योग.

उद्योगाची संस्थापना

औद्योगिक संस्थापनेमध्ये उद्योगाची निवड करणे, तो स्थापन करण्याची शक्यता अजमावणे, उद्योगाकरिता भांडवल उभारणे व त्याकरिता लागणारी मालमत्ता व संघटक मिळविणे, असे चार प्रमुख टप्पे आहेत. उद्योग सुरू करताना कोणता उद्योग सुरू करावयाचा, त्याचा आकार काय असावा, तो कोठे सुरू करावयाचा, त्याकरिता भांडवल किती व कसे मिळवावयाचे, त्यात कोणते उत्पादन- तंत्र वापरावयाचे वगैरेंविषयी निर्णय उद्योग-संयोजकांना घ्यावे लागतात. उद्योगाची निवड, त्याचा आकार, त्यातील भांडवल गुंतवणूक व त्यातील उत्पादन पद्धती आणि तंत्र ह्या गोष्टी, त्या उद्योगातील मालाची आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारपेठांतील मागणी, त्या उद्योगापासून मिळणारा नफा व त्या उद्योगाविषयी शासनाची भूमिका वगैरे प्रश्नांच्या अंदाजावरून ठरविल्या जातात. कारण, खाजगी क्षेत्रात उद्योग सुरू करण्याचा प्रधान हेतू नफा हाच असतो. वरील प्रश्नाचा निर्णय घेतल्यावर तो उद्योग कोठे सुरू करावयाचा, ह्याविषयी निर्णय घ्यावा लागतो. एखाद्या उद्योगधंद्याकरिता लागणाऱ्या साधनसामग्रीची व साहाय्यभूत असलेल्या इतर सोयींची उपलब्धता; उदा., पाणी, वीज, वाहतुकीची साधने, कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगारांचा पुरवठा, खेळत्या भांडवलाकरिता कर्ज देणाऱ्या संस्था व त्या ठिकाणी उत्पादनाला होणाऱ्या स्पर्धेचे स्वरूप वगैरे गोष्टी लक्षात घेऊनच त्या उद्योगाचे स्थान ठरवावे लागते.

उद्योग करताना विशेष करून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते..? आणि त्यासाठी  काय करावे लागते?

 • कोणताही उद्योग व व्यवसाय यशस्वी होण्यासाठी किती वेळ लागेल हे आपण अगोदरच सांगू शकत नाही. सुरुवातीला त्यातून मिळणारे उत्पन्न काहीच नसू शकते किंवा नगण्य असू शकते तर अशा स्थितीत व्यवसायाचा तो कठीण काळ काढण्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा किंवा घरखर्च भागवण्यासाठी पुरेसा पैसा तुमच्याकडे आहे का बघा नसेल तर तो पहिले तयार ठेवा.
 • थेट उद्योग व व्यवसायात उतरण्यापेक्षा जॉबकरून व्यवसाय करता येतो का पहा अशाने तुमच्याकडे एक इनकम फिक्स असेल जे तुम्हाला व्यवसायाने जरी महिना अखेर काही दिले नाही तरी काही आर्थिक प्रॉब्लेम नसेल.
 • उद्योग व व्यवसाय क्षेत्राबद्दल आपला अनुभव किती आहे याअगोदर आपण त्या क्षेत्रात कार्यरत होतात का तसं असल्यास तुमच्या या नवीन व्यवसायात तुम्ही लवकर यशस्वी होण्याची शक्यता असू शकते.
 • तुम्हाला या व्यवसायातुन साधारण पणे किती नफा मिळेल याचे मोजमाप तुमच्याकडे हवे. एखाद्या वस्तूचे उत्पादन असेल तर ती वस्तु बनविण्यासाठी तुम्हाला सध्यस्थीतीत खर्च येतो हे तुम्हाला ठाऊक पाहिजे.
 • तयार वस्तू किंवा सेवा तुम्ही कशी ग्राहकांपर्यंत पोचवणार आहात. ट्रॅव्हल माल वाहतूक( माल वाहतूक असेल तर रोजचा माल पोचविण्यासाठी गाडीची व्यवस्था त्यासाठी चा खर्च अचानकपणे गाडीचा प्रॉब्लेम झाल्यास दुसरी गाडीची तातडीची व्यवस्था)
 • तुम्ही व्यवसाय सुरू करत असलेल्या ठिकाणाची लोकसंख्या पहा. तेथील लोकांचे राहणीमान पहा. तेथील लोकांना तुम्ही विकत असलेली वस्तू , सेवा खरेदी करणे परवडेल का ते पहा.
 • आपण सुरू करत असलेल्या व्यवसायच्या ठिकाणी रहदारी बघा तेथून चालत जाणाऱ्या ची किंवा वाहनांची संख्या बघा.
 • आजूबाजूला इतर कोणते व्यवसाय आहेत ते पहा. इतर दुकानांत जाणारे आपलं दुकान बघून आपल्याही दुकानात येऊ शकतात.
 • तुम्ही जो व्यवसाय सुरू करत आहात तो प्लॅन A आहे आणि तो A प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात ते ही अगोदरच नियोजन करून ठेवा प्लॅन B तयार ठेवा.
 • नुकसान झाल्यास किती होईल याचा निदान अंदाज तुमच्याकडे असावा.
 • बंद करायचे असल्यास उरलेल्या मालाचे तुम्ही काय करणार आहात कसे विकणार आहात ते नियोजन करा; उदाहरणार्थ समजा साडीच दुकान असेल किंवा स्टेशनरी किंवा इतर काहीही असेल तर तुम्हाला तोटा दिसत असेल व्यवसायात किंवा इतर काही कारणास्तव पुढे जाउन ते बंद करायचे असल्यास इतर त्याच दुकानात तुम्हाला निदान ते पटकन अल्पावधीत आलेल्या भावात विकता आलं पाहिजे.
 • दिवसाच्या सुरुवातीपासून हिशेब ठेवा. यासाठी वेगळा वेळ काढा. चोख हिशेब तुम्हाला तुमची व्यवसायातील प्रगती, अधोगती दाखवतो. तुमची आर्थिक निर्णय घेण्याची ताकद वाढवतो.
 • जमल्यास सुरुवात ही कमी गुंतवणूकीतून करा.
 • ग्राहकांशी योग्य शब्दात बोला.
 • ऑफर ही गोष्ट खूप काम करते तिचा वेळोवेळी चाणाक्षपणे वापर करा.
 • गुणवत्तापूर्ण सेवा द्या. तुमचे ग्राहकच तुमची जाहिरात करत असतात.
 • व्यवसाय सुरू केल्या नंतर तब्बेतिकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. वेळच्या वेळी जेवण करण्याचा प्रयत्न करा. आरोग्य सांभाळा.
अत्यंत महत्त्वाचे “सर्व विषयी दक्ष असा”.

Content Credit : Ms. Ashvini Dhulap ( Founder )

वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक ,कॉमेंट्स , आणि शेअर करायला विसरू नका.

ध्येय व्यावसायिक घडवून… कोकणी उद्योजक असा समृद्ध आणि प्रगतिशील समुदाय निर्माण करणे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker