सिंधुदुर्ग जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती. ( History Of Sindhudurg District )
History Of Sindhudurg District

सिंधुदुर्ग ( Sindhudurg ) जिल्हा मुंबईपासून सुमारे ४५० कि.मी.अंतरावर हे पर्यटन क्षेत्र आहे .
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग!कोकणातल्या फणसासारखा गोड आणि रसाळ असा जिल्हा सिंधुदुर्ग !
सिंधुदुर्ग जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत.
- सावंतवाडी
- कणकवली
- कुडाळ
- देवगड
- दोडामार्ग
- मालवण
- वेंगुर्ला
- वैभववाडी
इतिहास: ( Sindhudurg history)
सिंधुदुर्ग जिल्हा पुर्वी रत्नागिरी जिल्हयाचाच एक भाग होता 1 मे 1981 ला तो स्वतंत्र जिल्हा म्हणुन उदयाला आला.ऐतिहासीक अश्या किल्ल्यामुळे या शहराला सिंधुदुर्ग असे नाव पडले.
25 नोव्हेंबर 1664 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीकोनातुन या किल्ल्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली आणि 3 वर्षांमधे सिंधुदुर्ग किल्ला संपुर्ण बांधुन तयार झाला.
समुद्रमार्गे येणाया शत्रुवर नजर ठेवण्याकरता आणि त्याला नामशेष करण्याकरता या किल्ल्याची निर्मीती झाली, या किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे हा किल्ला शत्रुला सहजासहजी दिसत नसे अश्या प्रकारे हा बांधण्यात आला आहे.
हा एकमात्र असा किल्ला आहे ज्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे आणि त्यांच्या पंजाची छाप या ठिकाणी पहावयास मिळते.
या जिल्हयात सुमारे 37 किल्ले असुन किल्ल्याचे सर्व प्रकार येथे बघायला मिळतात जसे सागरी जलदुर्ग, भुमीवरचा भुईकोट किल्ला, आणि उंच डोंगरावरचा गिरीदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी .
राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 या जिल्हयातुन गेला आहे. सिंधुदुर्ग च्या पुर्वेकडे अरबी समुद्र, दक्षिणेकडे कर्नाटक राज्यातील बेळगांव आणि गोवा आणि उत्तरेकडे रत्नागिरी जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा 1999 ला महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा घोषीत करण्यात आला. 121 कि.मी. चा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा या जिल्हयाला लाभलाय… या जिल्हयात अनेक प्रकारची रानफुलं आढळतात अभ्यासकांकरता हा अमुल्य असा ठेवा आहे. पर्यटन, मासेमारी, येथील मुख्य व्यवसाय. या ठिकाणी विशेषतः हापुस आंबा, फणस, काजु यांचे विपुल प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. सिंधुदुर्ग किल्ल्याला 21 जुन 2010 ला भारत सरकारनं महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणुन जाहीर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ऐतिहासीक असा किल्ला जणु काही समुद्रात पाय रोवुन उभा असल्यासारखा भासतो. कोकणचे गांधी म्हणुन ज्यांना गौरवलं जातं असे अप्पासाहेब पटवर्धन! सिंधुदुर्ग जिल्हयात कणकवलीजवळ गोपुरी या ठिकाणी यांचा आश्रम आहे. रत्नागिरी, बेळगांव आणि गोव्यातील दाभोली ही जवळची विमानतळं आहेत.
संस्कृती आणि वारसा आणि येथील वैशिष्टपूर्ण ग्रामीण जीवन.
सिंधुदुर्ग ( Sindhudurg ) जिल्हा येथे वैशिष्टपूर्ण ग्रामीण जीवन अनुभवता येते. मुख्य रोजगार शेती असल्यामुळे हिरवीगार भात शेती पावसाळ्यात अनुभवता येते. घरे सामान्यता जांभा दगड वापरून बांधलेली व कौलारू आहेत. पर्जन्यमान सरासरी जास्त असल्यामुळे उतरती कौलारू घरे सापडतात. जोडधंदा पशुपालन व किनारी प्रदेशात मत्स्य व्यवसायावर आधारित जीवन बघायला मिळते.जिल्ह्यातील बहुतांश भाग हा दाट वर्षावनाने झाकला गेलेला आहे.जंगली मांजरे या रानटी प्राण्यांसाठी तसेच ससे,रानटी कोंबड्या व रानटी रेडे यांच्यासाठी उपयुक्त निवासस्थान आहे.जंगली रेडे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यातून अन्न पाण्याच्या शोधात येथे येतात.अलीकडेच कर्नाटकातील खानापूर जंगलातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा प्रवेश झाला आहे.इथे प्रथमच वस्त्तीच्या शोधात हत्तींनी प्रवेश केला.तिलारी येथील प्रमुख पाठबंधारे प्रकल्प हा घनदाट वर्षावनांचा प्रदेश असून हत्तींसाठी एक महत्वाचे स्थान बनले आहे.परंतु येथील स्थानिक लोकांना हत्तींमुळे झालेली पिंकाची नासधूस व वृक्षतोड यांचा सामना करावा लागत आहे.
-
लाकडी खेळणी
सावंतवाडी येथे लाकडी खेळणी बनविण्याच्या व्यवसायाला राजाश्रय मिळाला आहे. तसेच हि कला करणारे कारागीर गोवा व कारवार येथून सावंतवाडी येथे वसलेले आहेत .या लोकसमुहास चित्तार असे संबोधतात . रंगीबेरंगी लाकडी खेळणी दिसायलाही हुबेहूब असतात. सावंतवाडी या शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते.
-
तिर्थस्थळं आणि पर्यटन स्थळं.
एकंदरीतच कोकणाला विस्तिर्ण असा समुद्रकिनारा लाभला असल्याने पर्यटनाकरताच हा जिल्हा ओळखला जातो. फिरण्याकरता तर असंख्य अशी ठिकाणं असुन जी मनाला शांतता आणि प्रसन्नता प्रदान करतात. अनेक धार्मीक स्थळं देखील भाविकांकरता महत्वाची असुन येथे दरवर्षी भाविकांची संख्या वाढतीच आहे.
-
सिंधुदुर्ग किल्ला/सिंधुदुर्ग जलदुर्ग
सिंधुदुर्ग ( Sindhudurg ) जलदुर्ग हा अरबी समुद्रात बांधलेला असून बहुचर्चित पर्यटन स्थळ आहे . मालवण शहरातील समुद्रात कुरटे बेटावर हा किल्ला शिवकालीन इतिहासाची साक्ष देतो.
ज्या प्राचीन ऐतिहासीक किल्ल्यामुळे या शहराला सिंधुदुर्ग असे नाव पडले असा सिंधुदुर्ग ( Sindhudurg ) किल्ला अरबी समुद्रात आजही भक्कम पणे उभा असलेला आपल्याला पहायला मिळतो.हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीची साक्ष पटवणारा आहे,
समुद्रमार्गे येणाया शत्रुवर नजर ठेवण्याकरता आणि समुद्र मार्गांची सुरक्षा करण्याकरता महाराजांनी या किल्ल्याची निर्मीती केलीहा किल्ला बांधण्याकरता साधारण 3 वर्षांचा कालावधी लागला 25 नोव्हेंबर 1664 ला मुहूर्तमेढ रोवली गेली आणि 3 वर्षांत हा किल्ला पुर्ण झाला.
या किल्ल्यावर गोडया पाण्याच्या 3 विहीरी पहायला मिळतात (दुधबाव, दहिबाव, आणि साखरबाव अशी या विहीरींची नावे) किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि किल्ल्यात गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच म्हणायला हवा.
किल्ल्याचे निरीक्षण करतांना हा किल्ला आणि त्यावरील बांधकाम किती विचारपुर्वक केले असावे याची साक्ष पटते.
ठिकठिकाणी तोफांसाठी नियोजीत जागा, दुरवर अवलोकन करण्याकरता खिडक्या, कपारी, सैनिकांच्या सुरक्षेकरता करण्यात आलेल्या उपाययोजना, समुद्रापर्यंत घेउन जाणारा भुयारी मार्ग हे पाहुन स्तिमीत व्हायला होतं.किल्ला बांधण्याकरता ज्या मच्छिमारांनी ही जागा शोधली त्यांना गावे ईनाम म्हणुन देण्यात आली.
या किल्ल्यावर एकमेव असे शिवाजी महाराजांचे मंदिर स्थापीत करण्यात आले आहे राजाराम महाराजांनी या मंदिराची स्थापना केली होती.महाराजांजवळ एकुण 362 किल्ले होते डोंगरी आणि भुईकोट किल्ल्यांच्या बरोबरीने शत्रुची स्वारी परतवुन लावण्याकरता जलदुर्गांची निर्मीती देखील आवश्यक असल्याचे महाराजांनी हेरले आणि कितीतरी जलदुर्गांची निर्मीती त्यांच्या काळात त्यांनी समर्थपणे केली.
आजची युवा पिढी जेव्हां या किल्ल्यांचे अवलोकन करते तेव्हां त्याकाळातील वास्तुनिर्मीती, स्थापत्यकला, दुरदृष्टीकोन पाहुन अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहातात.
या ठिकाणी राहाण्याची सोय गणपतीपुळे आणि तारकर्ली येथे होउ शकते त्या ठिकाणी डज्क्ब् ने राहाण्याकरता निवासाची सोय केली आहे.
-
सावंतवाडी राजवाडा
सावंतवाडी राजवाडा सिंधुदुर्गातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ ओळखले जाते. राजवाड्याची बांधणी खेम सावंत भोसले संस्थानांनी १७५५-१८०३ या काळात केली. सावंतवाडी शहरातील हे सुंदर पर्यटन स्थळ असून मुंबई,पुणे, तसेच कोल्हापूर येथून महामार्गाने येथे पोहोचता येते
-
देवगड येथील कुणकेश्वर मंदिर
शुभ्र वाळुचा समुद्र किनारा अनुभवायचा असेल तर कुणकेश्वर ला यायलाच हवे. फार प्राचीन असे महादेवाचे मंदिर या ठिकाणी असुन या स्थळाला दक्षिण कोकणाची काशी म्हणुनही फार प्रसिध्दी मिळाली आहे.येथील शुभ्र किनायावर पाण्यात खेळण्याचा आणि अंघोळ करण्याचा मनमुराद आनंद लुटता येतोयेथील समुद्रात असलेल्या डाॅल्फीनचं देखील दर्शन घडण्याची शक्यता जास्त आहे.
येथील समुद्र किनायाची एक संपुर्ण बाजु नारळाच्या आणि आंब्यांच्या झाडांनी वेढलेली असल्याने निसर्गाचं दान या ठिकाणाला भरभरून मिळाल्याचे पदोपदी जाणवत येथील स्वच्छ किनारा आणि शुभ्र वाळु नजरेत भरते.मुंबईपासुन 468 तर पुण्यापासुन कुणकेश्वर हे अंतर 368 कि.मी. असुन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ने येथे सहज पोहोचता येते.
कोल्हापुर पासुन हे अंतर कमी आहे.
-
विजयदुर्ग –
देवगड येथील विजयदुर्ग हा किल्ला जिल्हयाच्या किनारी असलेला सर्वात पुरातन असा किल्ला असुन 1205 साली शिलाहार घराण्याचे राजा भोज यांनी तो बांधलाय. पुढे विजापुरच्या आदिलशहाकडुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 साली तो जिंकला आणि त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले.
1653 ते साधारण 1818 या किल्ल्यावर मराठयांची सत्ता होती पुढे हा किल्ल्यावर इंग्रजांनी ताबा मिळवला.अजिंक्य अश्या या किल्ल्याला जिब्राल्टर असे देखील म्हंटले जायचे.17 एकर असा विस्तिर्ण परिसर या किल्ल्याने व्यापला आहे.किल्ल्याच्या तीनही बाजुने विस्तीर्ण असा समुद्र पसरलेला आहे.
या किल्ल्यात आपल्याला दोन भुयारी मार्ग दिसुन येतात किल्ल्याच्या पुर्वेकडे एक आणि पश्चिमेकडे दुसरा भुयारी मार्ग आहे.महाराष्ट्र राज्यातील संरक्षीत स्मारक म्हणुन 13 डिसेंबर 1916 रोजी हा किल्ला घोषीत करण्यात आला आहे.विजयदुर्ग पहायचा असल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथुन जाणे सोयीचे होईल. किल्ला पाहाण्याकरता सागरी महामार्गाची सफर सोयीची आणि आल्हाददायक ठरू शकते.
-
तारकर्ली समुद्रकिनारा – Tarkarli Beach
तुम्हाला स्कुबा डायव्हिंगचा आनंद घ्यायचाय का? जर उत्तर हो असेल तर चला तारकर्लीला!
स्कूबा डायविंग हा साहसी प्रकार सिंधुदुर्ग जिल्हा येथे मालवण बीच , तारकर्ली बीच याठिकाणी उपलब्ध आहे. समुद्राखालील निसर्ग सौंदर्य ,जैवविविधता आपणास या प्रकारामुळे अनुभवता येईल . या साहसी प्रकारात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आपणास समुद्राखालील जग पाहता येईल. त्यापूर्वी प्रशिक्षक आपणास योग्य ते मार्गदर्शन करतातसिंधुदुर्ग ते तारकर्ली समुद्र किनाऱ्यापर्यंत साधारण दिड तास लागेल पण येथे आल्यानंतर स्वच्छ पारदर्शक समुद्रकिनारा पाहुन तुम्ही आनंदीत व्हाल.हा समुद्र किनारा अरूंद किनारपट्टी असुन अरबी समुद्र आणि कर्ली नदी या संगमावर स्थित आहे.नितांत पारदर्शक आणि स्वच्छ पाणी त्यामुळे हा समुद्र किनारा पर्यटकांमधे फार लोकप्रीय आहे.तारकर्लीच्या किनाऱ्यावर आपण स्नोर्केलींग शिवाय स्कुबा डायव्हींगचा अविस्मरणीय असा अनुभव आपण घेउ शकतो.
येथील मालवणी पदार्थांची चव कायम तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील अशीच. येथे पोहोचण्याकरता जवळचे बसस्थानक मालवण चे आहे.
-
आंबोली हिल स्टेशन /घाट
स्थान : आंबोली ता.सावंतवाडी , जि. सिंधुदुर्ग ( Sindhudurg ) .आंबोली जाण्यासाठी सावंतवाडी येथून बसेस उपलब्ध आहेत. सावंतवाडी , मुंबई ,पुणे व कोल्हापूर येथून महामार्गाने जोडलेले आहेत. आंबोली हे पावसाळ्यातील खास प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील धबधबे व जैवविविधता खूपच रमणीय आहे. लगतचा जिल्हा कोल्हापूर तसेच बेळगाव येथून पर्यटक पावसाळ्यात मोठ्या संख्येने येतात.कोकणातले महाबळेश्वर म्हणुन प्रसिध्दी पावलेले हे ठिकाण महाराष्ट्रातील चेरापूंजी म्हणुन देखील ओळख मिळवुन आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयातले हे पर्यटनस्थळ सावंतवाडी या गावापासुन सुमारे 30 कि.मी. अंतरावर वसलेले आहे.येथील निसर्ग आणि चांगले हवामान यामुळे हे ठिकाण पर्यटकांना खुप आकर्षीत करते.
विस्तीर्ण पसरलेले दाट जंगल, मनाला हवेहवेसे वाटणारे सृष्टीसौंदर्य आणि खोल घाट डोंगरद.या, कोसळणारे धबधबे आणि 12 ही महिने येथील थंड हवामान ही या ठिकाणाची वैशिष्टय आपल्याला अधोरेखीत करता येतील.जवळच सावंतवाडी येथील राजांचा राजवाडा देखील आहे शिवाय देवीचे मंदिर देखील पहावे असेच.मनोहरगड, महादेवगड नागरतास धबधबा डोळयाचे पारणे फेडतात, आंबोलीच्या घनदाट जंगलात अनेक वन्यप्राणी मुक्त संचार करतांना दिसतात.
तुमच्या जवळ सिंधुदुर्ग ( Sindhudurg ) जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू.
पुढील लेखात आपण रत्नागिरी जिल्हाची माहिती पाहणार आहोत. तसेच सिंधुदूर्ग जिल्हातील प्रत्येक तीर्थस्थळ आणि ऐतिहासिक गोष्टींची माहिती विस्तारित सांगणारं आहोत.
दिलेली माहिती आवडली तर नक्की शेअर करा .
हे पण वाचा : कोणत्याप्रकारचे उद्योग व्यवसाय आपण कोकणात सुरु करू शकतो.
One Comment